रशिया - युक्रेन युद्ध तसंच युक्रेनचं बंद झालेले हवाई क्षेत्र यामुळे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या विविध पर्यायांचा सरकार विचार करत आहे.
हे पर्याय पडताळण्यासाठी हंगेरीतल्या भारतीय दूतावासाचं एक पथक सीमावर्ती भागात रवाना झालं असून भारतीयांना माघारी आणण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पोलंड, स्लोव्हाक गणराज्य आणि रोमानिया या देशांना लागून असलेल्या युक्रेनच्या सीमा भागातही आपली पथकं पाठवली आहेत. भारतीयांनी या पथकाशी संपर्क साधावा अश्या सूचना परराष्ट्र मंत्रालयानं दिल्या आहेत.
संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सद्य परिस्थितीत युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय अडकलेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तातडीनं उपाय योजना करत आहे, असं भारताचे युक्रेन मधले राजदूत पार्थ सत्पथी यांनी म्हटलं आहे.राज्यातले अंदाजे १ हजार २०० विद्यार्थी युक्रेनमधे अडकले आहेत. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे.
राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावरदेखील संकलित करण्याचं काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्पलाईन नंबर जाहिर केलेले आहेत. राज्याचा नियंत्रण कक्ष ०२२-२२०२७९९० या दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल तसंच व्हॉटस क्रमांक ९३२१५८७१४३ आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधता येईल.
महाराष्ट्रातले किती लोक अडकले आहेत याची माहिती विभाग घेत आहे. तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केलं आहे. जी जी मदत हवी असेल ती देण्यासाठी राज्य सरकार तयार आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. युक्रेनमध्ये अडकलेला गोंदीया जिल्ह्यातला विद्यार्थी पवन मेश्राम यानं आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
गोंदिया जिल्यातले ३ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असल्याची माहीती गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यानी दिली आहे. हे तीघेही वैद्यकीय शिक्षणासाठी तिथं गेले होते. या विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्हिडीयो बनवत सुटकेसाठी विनंती केली आहे.
भंडारा जिल्हातल्या चार विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना बाहेर काढावं, अशी मागणी पालकांनी केली आहे.ग़डचिरोली जिल्ह्यातले दिव्यानी सुरेश बांबोळकर आणि स्मृती रमेश सोनटक्के या दोन विद्यार्थीनी युक्रेनमध्ये अडकल्या आहेत. या दोघीही युक्रेनची राजधानी किएव पासून अडिचशे किलोमीटरवर असलेल्या व्हिनित्सिया राष्ट्रीय विद्यापिठात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.दरम्यान युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १० लष्करी अधिकाऱ्यांसह १३७ जणांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलदीमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
रशियाच्या हल्ल्यात ३१६ नागरिक जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. रशियानं लष्करी आणि नागरी ठिकाणांवर हल्ला केल्याचं, झेलेन्स्की यांनी आज सकाळी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं आहे. रशियानं युद्ध थांबवावं अशी मागणी त्यांनी केली आहे. सिमी शहरात रशियाच्या हल्ल्याला युक्रेनच्या नागरिकांनी केलेल्या प्रतिकाराची दृश्यं युक्रेनच्या लष्करानं प्रसारित केली आहेत.