रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे तेथील परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. दोन दिवसांपूर्वी भारताने एअर इंडियाच्या विमानाद्वारे युक्रेनमधील भारतीयांना मायदेशी सुखरूप आणले. आता युद्ध सुरू झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच नाशिकमधील दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची बाब समोर आली आहे.
या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना विनंती अर्ज दिला असून मदतीची मागणी केली आहे. प्रतीक प्रमोद जोंधळे आणि आदिती विवेक देशमुख हे दोन विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये आहेत. हे दोघेही तेथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. अदिती व विवेक हे मावसभाऊ बहीण आहेत. युक्रेनच्या खर्किव मेडिकल हॉस्टेलमध्ये ते सध्या वास्तव्यात आहेत. या दोघांनाही मायदेशी परत आणावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेन मध्ये अडकले आहेत, त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधावा. विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत, त्यांची काळजी घेण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी बोलावे असे सांगितले आहे. या नागरिकांच्या सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केले आहे.
Source and credits:- Maharashtra times