Published by: Ournashik.com
Date: 07-03-2022
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रो प्रकल्पपाचं उद्घाटन केलं. एकूण ३२ किलोमीटरपेक्षा जास्त लांबींच्या ह्या प्रकल्पातल्या १२ किलोमीटर लांबीच्या खंडाचं उद्घाटन त्यांनी केलं. हा संपूर्ण प्रकल्प ११ हजार ४०० कोटी रुपयांचा आहे. प्रधानमंत्र्यांनी गरवारे मेट्रो स्थानकात आयोजित प्रदर्शनाच उद्घाटन केलं, तसंच तिथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत त्यांनी मेट्रो प्रवासही केला. पुणे शहरातल्या प्रवासाकरता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हा मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरु केला आहे. त्याची पायाभरणी २४ डिसेंबर २०१६ ला मोदी यांनी केली होती.
या कार्यक्रमासाठी आज सकाळी पुण्यात पोचल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. गनमेटलमध्ये तयार केलेल्या या पुतळ्याची उंची साडेनऊ फुट असून त्यासाठी १ हजार ८५० किलो गनमेटल वापरलं आहे. आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुण्यातल्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही झालं. एमआईटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की, देशाच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे.
राज्यात मेट्रो जाळ्याचा विस्तार झपाट्यानं होत आहे. पुणे मेट्रो रेल्वे चालवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. प्रत्येक शहरात जास्तीत जास्त हरित वाहतूक व्यवस्था हे सरकारचं ध्येय आहे, असं ते म्हणाले.