गेल्या १२ दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या लिलाव बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सुमारे १००० ते १२०० कोटींची उलाढाल ठप्प झालेली आहे. मुख्य मागणी असलेल्या ४० टक्के निर्यात शुल्क रद्दबाबत केंद्र सरकारकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने बंदच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता असल्याने शेतकरीवर्ग भांबावलेल्या स्थितीत आहे.
आजदरम्यान, विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात कांदा लिलाव दि. २ ऑक्टोबरपासून सुरू झाले असून येत्या मंगळवारी (दि.३) अन्य बाजार समित्याही सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.