Published by: Ournashik.com
Date: 17-03-2022
होळी आणि धुलिवंदनासाठी नवी नियमावली जारी
आकाशवाणी
होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक आहे, डीजे लावायला मनाई केली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असं गृह मंत्रालनं म्हटलं आहे. कोविडचा प्रादुर्भाव अजूनही असल्यानं मास्कचा वापर, सामाजिक अंतराचा नियम पाळणं गरजेचं आहे. राज्यात सध्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यानं ध्वनीवर्धक लावू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
राज्यातल्या सहकारी चळवळीतले नेते तसंच माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन
आकाशवाणी
राज्यातल्या सहकार चळवळीतले ज्येष्ठ नेते, तसंच माजी मंत्री सहकार महर्षि शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे नाशिक इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेचार वाजता कोपरगाव इथं संजीवनी शिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोल्हे यांनी १९६० मध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था, तसंच शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या. त्यांनी दीर्घकाळ विधानसभेत कोपरगावचं प्रतिनिधीत्व केलं.
१९७२ पासून १९८५ ते १९९० चा अपवाद वगळता ते सहावेळा कोपरगावचे आमदार होते. या काळात महसूल, परिवहन, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केलं. त्यासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले होते.
कोल्हे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकार, सामाजकारणातलं बहु आयान आणि भारदस्त नेतृत्व गमावल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं आहे. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांचा आधारस्तंभ म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली. त्यांची उणी
व निश्चितपणे जाणवत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी सहकार-शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. पाण्याचे प्रश्न ते अतिशय पोटतिडकीने मांडत. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभारलं. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे, असं फडनवीस यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडांसंदर्भात आढावा घेण्यासाठी मुंबईत महानगरपालिका सहावं सेरो सर्वेक्षण करणार
आकाशवाणी
कोरोना प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रेनंतर आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंडं तयार झाली, आणि ही प्रतिपिंड किती काळ टिकणार याचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर पालिका सहावं सेरो सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
९ महिने इतक्या मोठ्या कालावधी पर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. हे सर्वेक्षण तीन टप्प्यात केलं जाणार आहे.कोरोनाच्या तीसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांच पूर्ण लसीकरण करण्यात आलं. मात्र मोठ्या कालावधी नंतर या कर्मचाऱ्यांची प्रतिपिंड कमी झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात आली होती.
कोरोनाची तीसरी लाट ओसरत असतान कोरोनाची संभाव्य चौथी लाट पुन्हा येण्याचे संकेत दिले जात आहेत. त्यामुळे वर्धक मात्रेनंतर हे कर्मचारी चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी पुरेसे सक्षम आहेत का, की त्यांना आणखी वर्धक मात्रा देण्याची गरज आहे, याचा अभ्यास पालिका करणार आहे.
राज्यात कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २ हजाराच्या खाली
आकाशवाणी
राज्यात कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २ हजाराच्या खाली आली असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक १ दशांश टक्के झालं आहे. राज्यात आज २३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. ४५५ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर २ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ७१ हजार ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २१ हजार ९६५ रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४३ हजार ७५९ रुग्ण दगावले. राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात २ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
Source and credit: AIR News