सुप्रसिद्ध अशा माउंटशाडो रिसॉर्टमधील हुक्का पार्टीत (Hookah party) नशेत बेधुंद होऊन झुलणारे 52 तरुणांना इगतपुरी न्यायालयाने (Court) दणका दिला आहे. त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे. तर देहविक्रीसाठी महिला पुरवणाऱ्या शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर यांना 16 मार्चपर्यंत पोलीस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी वकील अॅड. अर्चना महाले यांनी दिली. तर उर्वरित 18 महिलांना कलम 15 प्रमाणे वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. या तरुणींचे नातेवाईक आल्यावर त्यांच्या ताब्यात कस्टडी दिली जाईल, तर उरलेल्या संशयित आरोपींचे जामीन अर्ज उद्या न्यायालयात दाखल करण्यात येणार असून, त्यांना जामीन मिळण्याची आशा खासगी वकिलांनी व्यक्त केली. मात्र, दुसरीकडे या पार्टीत चक्क देहविक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याची साखळी मोठी असून, या गुन्हेगारांचे कंबरडे मोडणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान असणार आहे.
नेमके प्रकरण काय?
इगतपुरी येथील माउंटशाडो रिसॉर्टमध्ये 13 मार्च रोजी मध्यरात्री हुक्का पार्टी रंगल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. तेव्हा रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअरपार्ट कंपनीतील देशातील आणि प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रीब्यूटर असलेले ते 52 तरुण व देहविक्री करणार्या 18 तरुणीसह 2 महिलांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्यावर इगतपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार कायदा व सिगारेट तंबाखू मुंबई प्रोव्हिजन अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘त्या’ आरोपी नव्हे पीडित
सर्व संशयितांना इगतपुरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत युक्तिवाद चालला. यावेळी सरकारी वकिलांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र, यामधील 18 महिला या अनैतिक कायद्यानुसार आरोपी होऊ शकत नाहीत. त्या पीडित असतात, असे म्हणत न्यायालयाने त्यांना वगळता इतर 52 तरुणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. शिवाय सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हा कायदा जामीनपात्र असल्यामुळे त्यांना पोलीस कोठडी नाकारली. मात्र, देहविक्रीसाठी महिला पुरवणाऱ्या दोघींना पोलीस कोठडी सुनावली. यावेळी संशयितांकडून अॅड राहुल कासलीवाल, सचिन भाटी, नदीम मेमन, विलास पाटील, संदेश देशमुख यांनी सरकारी वकीलांशी युक्तिवाद केला.
नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेची (municipal corporation) प्रभाग रचना नव्याने होणार असल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत विशिष्ट वॉर्डातून आपल्यालाच तिकीट मिळणार, अशा अतिआत्मविश्वासात राहून धडाडीने प्रचार करणाऱ्या इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. राज्य सरकराने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पेचामुळे राज्य निवडणूक (election) आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतलेत. त्यानुसार 12 मार्च रोजी राजपत्रात अधिशूचना प्रसिद्ध झाली. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत ज्या प्रभागामध्ये विभागणी किंवा त्यांच्या हद्द निश्चितीची प्रक्रिया सुरू असेल अथवा पूर्ण केली असेल, तर ती आता रद्द झाल्याचे मानण्यात येणार आहे. त्यामुळे जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द होणार आहे. शिवाय आक्षेपानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची आशाही मावळली आहे. मात्र, या प्रकरणात अनेक जण न्यायालयाचा दरवाजाही ठोठावू शकतात.
प्रशासक राज सुरू
महाालिकेचे विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत आज 15 मार्च रोजी संपतेय. त्या पार्श्वभूमीवर 14 मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी कामकाज हाती घेतले आहे. महापौर आणि उपमहापौरांनी महापालिकेची वाहन जमा केलीयत. महापौरांचे शासकीय निवासस्थानही आता प्रशासकांच्या अखत्यारित येणार आहे.
सत्तेची चावी सरकारकडे
जिल्हा परिषदेतील कारभाऱ्यांचा कार्यकाळ 20 मार्च रोजी संपत आहे. येथेही प्रशासकीय राजवट लागू होणार असून, येथील प्रशासकीय सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हाती जाणार आहेत. प्रशासक राजवटीत महापालिकेत आयुक्त आणि जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढणार असल्याने सत्तेची खरी चावी महाविकास आघाडी सरकारडेच जाणार आहे.
निवडणूक दिवाळीत
महापालिकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलल्याचे सरकार म्हणत आहे. मात्र, या निवडणुका दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेतही असाच अंदाज वर्तवला. जून-जुलै महिन्यात पावसाळा सुरू होईल. त्यामुळे त्या काळात निवडणुका होणार नाहीत. आता थेट दिवाळीची वाट पाहावी लागेल, असे राज म्हणाले. तसे झाले तर ज्यांनी सध्या प्रचार सुरू केलाय, त्यांना पुन्हा प्रचारासाठी जोर लावावा लागेल. त्यातही वॉर्डची बदलाबदली झाली, तर सध्याची तयारीही वाया जाईल, अशी चिन्हे आहेत.
Source and credit: TV9