पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर कर कपात केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास वेगानं होत आहे - नरेंद्र मोदी
भारतात येणारी आणि भारतातून जाणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणं येत्या २७ मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहेत, असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयानं मार्च २०२० मध्ये नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणं स्थगित केली होती. जगभरात लसीकरणाची व्याप्ती वाढल्यानंतर संबंधितांशी सल्लामसलत करुन केंद्र सरकारनं नियोजित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतला आहे.
जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. “पूर्वग्रह तोडा” ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे. देशात विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा होत आहे. राज्यातल्या महिला दिन सप्ताहाची सुरूवात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाली.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गेल्या 1 मार्चपासूनच महिला दिन सप्ताह राजधानी नवी दिल्लीत साजरा होत असून आज समारोपाच्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांना नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित केलं. 2020 आणि 2021 या दोन वर्षातले मिळून 28 पुरस्कार 29 महिलांना देण्यात आले. महाराष्ट्रातल्या डाऊन सिंड्रोम पीडित नृत्यांगना सायली आगवणे, पहिल्या महिला सर्परक्षक वनिता बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार या तिघींचा विजेत्यात समावेश आहे.
विविध क्षेत्रात महिला चमकदार कामगिरी करत असून त्यांची स्वप्नं साकार करण्यासाठी सर्वांनीच पुढे यावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. महिलांप्रति कोणत्याही प्रकारे दुजाभाव नसावा, तसंच त्यांना समान संधी मिळावी याकरता सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं. महिलांचा सन्मान राखून त्यांना संधीची नवनवी दालनं उघडून देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
राज्यातला महिला दिन सप्ताह आजपासून सुरु झाला. बदलत्या काळानुसार समाजातलं स्त्रियांचं स्थान, त्यांचे हक्क आणि त्यांच्या रक्षणासाठीचे कायदे अशा विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानं तसंच करिअर साठी मार्गदर्शन शिबिरं, मेळावे होणार आहेत. याखेरीज वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, अनुभव कथन, विशेष चित्रपट, लघुपटांचं प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम आहेत. भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया द्वारे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
धुळे इनर विल क्रास रोड क्लब , अहिल्यादेवी विद्यालय यांच्या वतीनं प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर लेझीम पथकानं कलाविष्कार सादर केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालय क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो कार्यालय सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं जन भागीदारी के साथ 7 साल या विषयावरील चित्रप्रदर्शन आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळच्या बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. उपजिल्हाधिकारी डॉ.स्नेहल कानिंचे यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केलं.
जालना जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागानं आज उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा आणि अंगणवाडी सेविकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव केला. या ठिकाणी पोषण आहार प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीनं 2 बाइक रॅली काढण्यात आल्या. या रॅलीत 100 महिला पोलिसांनी सहभाग घेतला. यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग उपस्थित होते.
Source and credit: AIR news