राज्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये व्यापक मोहीम हाती घेण्याची गृह राज्यमंत्र्यांची घोषणा
आकाशवाणी
राज्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये एक व्यापक मोहीम हाती घेतली जाईल, असं गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. विरोधकांनी नियम २६० अन्वये कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.
कायदा आणि सुव्यवस्था तसंच जनतेच्या सुरक्षेला महाविकास आघाडी सरकारचं प्राधान्य असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पोलिसांचं सुसूत्रीकरण आणि बळकटीकरण करण्यावर भर दिल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र त्यांच्या या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही. गृहराज्य मंत्र्यांनी मूळ प्रश्नांना बगल दिल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. विरोधकांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.इयत्ता बारावीच्या परीक्षेची कुठलीही प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.
मुंबईत विलेपार्ले इथल्या एका परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचं वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग वॉटसअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी आतापर्यंत २६ जणांना अटक केली असून, येत्या ८ दिवसात याप्रकरणी आरोपपत्रं दाखल केलं जाणार आहे, असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. याप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला मिळाला आहे, त्यातल्या शिफारशीनुसार उपाययोजना केल्या जातील, तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.वाळूचोरीला आळा घालण्यासाठी अशा गुन्ह्यातल्या आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई करण्याची सूचना सभापती रामराजे निबांळकर यांनी सभागृहाला केली, त्यासाठी मोक्का कायद्यात सुधारणा करण्याबाबत विचार केला जाईल, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या भाषणानं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात झाली.
१२ ते १४ वर्ष वयोगटाच्या मुलांचं उद्यापासून लसीकरण सुरु करण्याचा निर्णय
आकाशवाणी
येत्या १६ मार्चपासून १२ ते १४ वर्ष वयोगटाच्या मुलांचं कोविड लसीकरण सुरु करण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे.
या टप्प्यात २००८, २००९ आणि २०१० साली जन्मलेल्या मुलांना कोर्बेवॅक्स लस दिली जाईल. हैदराबाद इथल्या बायोलॉजिकल इवान्सल औषध कंपनीनं या लसीचं उत्पादन केलं आहे.
तसंच येत्या १६ मार्चपासून ६० वर्षावरच्या सरसकट सर्व नागरिकांना कोविड लसीची वर्धक मात्रा मिळणार आहे. आतापर्यंत ६० वर्षावरच्या सह व्याधी असलेल्या नागरिकांना कोविडची वर्धक मिळत होती. देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमे अंतर्गत १४ वर्षावरच्या मुलांचं लसीकरण यापूर्वीच सुरु झालं आहे.
बंगळूरू इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय
आकाशवाणी
बंगळूरू इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवला. याबरोबर दोन सामन्यांची ही मालिकाही भारतानं २-० अशी जिंकली.
विजयासाठी ४४७ धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेनं, आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कालच्या १ गडी बाद २८ धावसंखेवरून आपला दुसरा डाव पुढे सुरु केला. काल खेळपट्टीवर टिकून राहिलेल्या कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९६ धावांची भागिदारी केली. मात्र त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले, आणि अखेर त्यांचा दुसरा डाव २०८ धावांतच आटोपला.
दिमुथ करुणारत्नेनं शतकी खेळी करत १०७ धावा केल्या, तर कुसल मेंडीस यानं ५४ धावा केल्या.भारताच्या वतीन आर. अश्विन यानं ४, जसप्रित बुमराह यानं ३, अक्षर पटेल यानं २ तर रविंद्र जडेजा यानं श्रीलंकेचा एक गडी बाद केला. या सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केलेल्या श्रेयस अय्यर याला सामनावीराच्या, तर ऋषभ पंत याला मालिकाविरा
च्या पुरस्कारानं गौरवलं गेलं.
Source and Credit: AIR News