नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात (Accident) एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, दोन जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार (treatment) सुरू आहेत. अपघाताची पहिली घटना ही आडगाव-म्हसरूळ लिंकरोडवर घडली. यात पिकअप वाहनाने धडक दिल्याने 55 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुभाष वामन कोठावदे, असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठावदे हे राधा कांबळे यांना घेऊन दळण दळून आणण्यासाठी गिरणीवर जात होते. त्यांची दुचाकी आडगाव म्हसरूळ लिंकरोडवरील देशमुख चौकात दुचाकी आली. तेव्हा एका पिकअप वाहनाने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. तर कोठावदे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवेंद्र सोनगीरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चतुर हे करत आहेत.
दुचाकी आणि चारचाकीची टक्कर
नाशिकमध्ये दुसरा अपघात शहरातील सातपूर येथे रात्रीच्या सुमारास झाला. एका तीस वर्षीय तरुणाची मोटार सायकल आणि चारचाकी गाडीची समोरासमोर टक्कर झाली. या अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. गंधर्व नंदा शाहू असे अपघातातील जखमी तरुणाचे नाव असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंधर्व हा रात्री काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. काम संपवून शिवाजीनगरकडे जात असताना कारने अचानक घेतलेल्या वळणामुळे मोटारसायकल कारवर आदळली. त्यात गंधर्व कारच्या बोनेटला लागून लांब फेकला गेला. यात गंधर्व गंभीर जखमी झाला आहे.
दुचाकीस्वारांचे मृत्यूसत्र
नाशिकमध्ये गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले. परीक्षा घेतली. कार्यालयात हेल्मेटसक्ती करायचे आदेश दिले. हेल्मेटसक्ती न करणाऱ्या कार्यालयाच्या प्रमुखांना दंड ठोठावले. मात्र, अजूनही नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती यशस्वी झाली नाही. पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर मात्र, हेल्मेट नसेल, तर प्रवेश नाही, हा फलक पाहायला मिळतो.
Source and credit: TV9