Nashik latest news

Nashik latest news

नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात: पती-पत्नीचा जागीच मृत्यू; दुचाकीचा चक्काचूर

नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर दत्त मंदिर चौकातील सद्गुरू हॉटेल समोर हा अपघात झाला. सिग्नल सुटल्यानंतर एका अज्ञात डंपरने पाठीमागून दुचाकीला भीषण धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी चिरडले गेले आणि या दुर्घटनेत त्यांनी आपला जीव गमावला.विठ्ठल दादा घुगे आणि सुनीता घुगे अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेला डंपरचालक घटना स्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

शिवजयंतीनिमित्त शहर भगवेमय

शहरात येत्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी चौकाचौकांत भव्य व्यासपीठांची बांधणी सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील चौकांभोवतालचे रस्तेदेखील भगवेमय झाले आहेत. यंदा कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर बंधने असल्याने मिरवणुकीस परवानगी देण्यात आली नसली, तरी मंडळांना बंधने पाळून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात दरवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणावर बंधने आली होती. तूर्तास कोव्हिडची तिसरी लाट ओसरलेली नाही. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्याने इतर व्यवहार सुरळीत आहेत. यामुळे मिरवणुकीऐवजी इतर कार्यक्रमांना नियम पाळून जयंतीच्या दिवसापुरती परवानगी देण्याचे पोलिस प्रशासनाचे नियोजन आहे. जयंतीच्या मुख्य सोहळ्यासाठी शहरात आतापासूनच वातावरणात रंगत भरू लागली आहे. वाहनांसह चौकांमध्ये भगव्या झेंडे लावणे, स्टेज उभारणी सुरू आहे. शिवभक्तांकडून फेट्यांना मागणी वाढली आहे. हार-फुलांचेही बुकिंग झाले आहे. त्यामुळे शिवजयंतीसाठी कार्यकर्त्यांमध्ये दांडगा उत्साह असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जुन्या नाशिकसह नाशिकरोड परिसर, पंचवटी, सातपूर, अंबड आदी उपनगरांमध्येही या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते. यंदा या सोहळ्याच्या आयोजनास आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याने राजकीय पक्षांनीही शिवजयंती सोहळ्याच्या आयोजनात उत्साहाने सहभाग घेतला आहे.


बाजारपेठ गजबजली

भगवे झेंडे बाजारपेठेत आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. झेंड्यांबरोबर शिवमुद्रा, शिवप्रतिमा, स्टेज सजावटीचे साहित्य, पताका आदी वस्तूंना चांगली मागणी आहे. सजावटीच्या साहित्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. शिवविचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतूने विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा, व्याख्याने-चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे, एकपात्री प्रयोग आदी उपक्रम साजरे होणार आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

थकबाकीदारांना 'झटका'

महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औदयोगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीच्या ५ लाख ९१ हजार ग्राहकांकडे सद्यस्थितीत जवळपास ७७८ कोटी ६७ लाख रुपये थकबाकी आहेत. महावितरणची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने ही बाकी वसूल करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. त्यानुसार नाशिक परिमंडलात जानेवारी महिन्यात १६ हजार ९७३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

थकबाकीदारांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही थकबाकी वसूल होत नसल्याने महावितरणने कठोर कारवाई सुरू केली आहे. ग्राहकांना वेळेत वीजबिल भरता यावे सासाठी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर वेळोवेळी संदेश पाठवूनही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मागील महिन्याप्रमाणे फेब्रुवारी व मार्च महिन्यातही कठोर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी त्यांना नोटीस पाठविली जात आहे. या नोटिशीचा कालावधी संपताच वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

शुल्क भरल्यास पुन्हा जोडणी

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर २४ तासांच्या आत वीजपुरवठा पूर्ववत केला लाईल. मात्र गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.