नाशिकः अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पाने (Pushpa) रसिकांना वेडे केले आहे. मात्र, दुसरीकडे अनेक भामटे पुष्पा राज्यात वावरत असून, अशाच सुगंधीत चंदनाची तस्करी करणाऱ्या दोघा संशयितांना अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी नाशिकमध्ये (Nashik) बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून एकूण 18 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सुभाष दिलवाले आणि राजेंद्र सासवडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून तब्बल 370 किलो चंदनाचे लाकूड हस्तगत करण्यात आले आहे. हे दोघे सुगंधी चंदन घेऊन इनोव्हा गाडीतून नगर मार्गे जाणार असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
‘त्या’ भामट्यांचा शोध लागेना
सध्या पुष्पा चित्रपटातील डायलॉग गाजताहेत. त्यात रक्त चंदनाच्या तस्करीची मिळणारे करोडो रुपयांचे गारुड सध्या अनेकांवर आहे. नेमकी हीच बाब हेरुन सात – आठ भामट्यांनी श्री लक्ष्मी गणपती नर्सरी नावाची कंपनी स्थापन केली. त्यात वरून आम्ही तामिळनाडूतून आल्याची बतावणी केली. या टोळीने देवळा, मालेगाव व चांदवड तालुक्यातील हद्दीवरील गिरणारे, कुंभारडे, झाडी, कोकणखेडे, उसवाड गावातील शेतकऱ्यांना रक्त चंदनाची लागवड करण्याचे आमिष दाखवले. रक्त चंदनाचे एक झाड लावण्यासाठी 200 रुपये भरा. त्या बदल्यात तुम्हाला 20 हजार रुपये अनुदान देऊ, अशी थाप मारली. या आमिषापोटी अनेकांनी लाखो रुपये या भामट्यांच्या हवाली केलेत. त्यानंतर हे भामटे बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलाय.
तुम्हीही रहा दक्ष
नाशिक जिल्ह्यात भामट्यांच्या आमिषाला भुलून अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. कोणी लाख, कोणी दोन लाख असे पैसे भरले. मात्र, पाच ते सहा दिवसांपासून कंपनीने आपला गाशा गुंडाळला आहे. त्यांना संपर्क केला, तर त्यांचे फोनही लागत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुष्पा सिनेमात रक्त चंदनांने मालामाल झालेला अभिनेता पाहायला मिळाला. मात्र, येथे रक्त चंदनाच्या आमिषामुळे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सुरूय. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सर्तक व्हावे. तुमच्या गावात असा पुष्पा आला तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी.
Source and Credit:- TV9