नाशिकची वाटचाल करोनामुक्तीकडे; रुग्णालयांमध्ये फक्त १५ रुग्णे

 नाशिकची वाटचाल करोनामुक्तीकडे; रुग्णालयांमध्ये फक्त १५ रुग्णे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिक शहरात वेगाने लसीकरण झाल्यामुळे करोनाची तिसरी लाट निष्प्रभ ठरली असून, अवघ्या महिनाभरातच ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटची तीव्रता कमी झाली आहे. शहरात गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून, सद्य:स्थितीत सक्रिय रुग्णसंख्या १३८ पर्यंत खाली आली आहे. विशेष म्हणजे शहरातील करोनाचा पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्यावर येऊन ठेपला असून, अवघे १५ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे नाशिकची वाटचाल करोनामुक्तीकडे सुरू झाली आहे. रुग्णसंख्या घटल्यामुळे प्रशासनाने आता बिटकोतील काही विभाग नॉनकोव्हिड रुग्णांसाठी सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे करोनाची तिसरी लाट सर्वांत घातक ठरेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला असला तरी शहरात लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्यामुळे शहरात तिसरी लाट सौम्य झाली आहे. शहरात लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने महिनाभरातच करोना उतरणीला लागला आहे. गेल्या २३ जानेवारी रोजी शहरात करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला होता. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १०,९४८ पर्यंत पोहोचली होती, तर पॉझिटिव्हिटीचा दर ३९ टक्क्यांपर्यंत होता.

रुग्णालये नॉनकोव्हिड

करोनाची तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याने आता रुग्णालये नॉनकोव्हिड केली जात आहेत. डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय, तसेच बिटको रुग्णालय हे करोनासाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र, आता या रुग्णालयांमध्ये रुग्ण अल्प असल्यामुळे या रुग्णालयांमधील काही भाग नॉनकोव्हिडसाठी सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

Source and Credit- Maharashtratimes