मुंबई – नाशिक महामार्गावर एका भीषण अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. हा मोटारसायकलस्वार नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्याने जुना कसारा घाट चढला. त्यानंतर अपघात झाला. मृताचे शव रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मात्र, अपघात इतका भीषण होता की, पोलिसांनाही ते दृष्य पाहून अक्षरशः धडकी भरली. त्यामुळे कुठेही जायची घाई करू नका. वाहने सावकाश चालवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं आज चार महिला आंदोलनकर्त्यांना मुक्त केलं. या आंदोलनकर्त्या महिला एका रॅलीत सहभागी झाल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये सत्ता संपादन केल्यावर तालिबान सरकार आपल्या विरोधकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिलांच्या रॅलीला उध्वस्त करणं, टीकाकारांना अटक करणं, आपल्या विरोधातल्या आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या स्थानिक पत्रकारांना मारझोड करणं यासारख्या कारवाया करत आहे. आज मुक्त करण्यात आलेल्या महिलांना आपण ताब्यात घेतल्याचं वृत्त अफगाणिस्तानच्या प्रशासनानं फेटाळलं होतं. अफगाणिस्तानमधल्या तालिबान सरकारला जगातल्या कुठल्याही देशानं अजून मान्यता दिलेली नाही.
नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या, २०२१या वर्षाच्या, हिवाळी सत्र अभ्यासक्रम परीक्षा आजपासून सुरु झाल्या. या परीक्षाअंतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि अंतीम वर्षाच्या परीक्षा, तसंच दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, स्पीच लॅग्वेज पॅथालॉजी, ऑडिओलॉजी या विषयांच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेतल्या जात आहेत. राज्यभरातले २ हजार ३३५ विद्यार्थी या परीक्षा देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरक्षीत वातावरणात घेता याव्यात यासाठी विद्यापीठानं अतिरिक्त परीक्षा केंद्र आणि परीक्षा खोल्यांची व्यवस्था केली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई पासपोर्ट तयार करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ई पासपोर्टमुळे बनावट पासपोर्टला पूर्ण आळा बसणार असल्याने देशाची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक भक्कम राहण्यास मदत होणार आहे. तसेच विमानतळावर परदेशात जाणाऱ्या नागरिकांचा वेळही वाचणार आहे.
जगातील ७० ते ८० देश ई पासपोर्ट देत आहेत. आता भारतातही ई पासपोर्टधारकांची संख्या वाढणार असून आगामी काही दिवसांत ई-पासपोर्टच ग्राह्य होईल. परदेशात जाण्यासाठी संबंधित देशाच्या दूतावासात जाऊन व्हिसा घेण्यासाठी विलंब लागतो. मात्र ई पासपोर्टमध्ये संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती राहणार असून त्यामुळे त्याच्या पासपोर्टवर पत्ता, कोणत्या देशात किती वेळेस गेला याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल. सध्या नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-पासपोर्ट तयार करण्यात येत आहे. वर्षाकाठी १ ते २ कोटीपर्यंत पासपोर्ट तयार करण्यात आले आहेत. ई -पासपोर्टमुळे बनावट पासपोर्ट होणार नसल्याने फसवणुकीला आळा बसेल. त्याचप्रमाणे देशातील जुने २५ ते ३० कोटी पासपोर्ट रद्द होऊन या नागरिकांना आता ई पासपोर्ट घ्यावे लागणार आहेत. सर्व ई पासपोर्ट नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार होणार असून दरवर्षी दीड ते दोन कोटी पासपोर्ट तयार करण्याचे काम मिळणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ५६ शिक्षणक्रमांच्या सत्र परीक्षा (हिवाळी) ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुक्त विद्यापीठाच्या या परीक्षांना मंगळवारपासून (दि. ८) सुरुवात होणार आहे. या परीक्षेत राज्यभरातील ७७ हजार ७८९ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.
विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी प्रॉक्टर्ड या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला असून परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर सॉफ्टवेअर व वेब कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवली जाईल. कॅमेऱ्यासमोर हालचाल झाल्यास सॉफ्टवेअर वाॅर्निंग देईल. विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकच्या वॉर्निंग दिली जाईल. त्यानंतर परीक्षा आपोआप बंद होईल.
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेत मुक्त विद्यापीठाने हिवाळी सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२२ च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या ऑफलाईन परीक्षा विद्यापीठाने रद्द केल्या आहेत. ऑनलाईन परीक्षा ८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान घेतल्या जाणार आहे.
५० पैकी ४० प्रश्न सोडवणे बंधनकारक
५६ शिक्षणक्रमांच्या ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेत एकूण ५० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी असून एकूण प्रश्नांपैकी किमान ४० प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांचे वर्गीकरण अंतिम परीक्षेच्या शीर्षाखाली ८० गुणांमध्ये दर्शवले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेपर सोडवताना प्रश्नाखाली असलेल्या चार पर्यायासमोरचे रेडिओ बटन दाबून उत्तराची निवड करावयाची आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एम. जी. एम. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये ट्रक आणि टेम्पोच्या मध्ये आल्याने कारचा चुराडा झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण हे गंभीर जखमी आहेत.
घटनेची माहिती मिळताच येथे महाराष्ट्र सुरक्षा दल ,देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलिस दाखल झाले. जखमींना पनवेलमधील एम जी एम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 24,740 नवे रुग्ण आढळले, 82.7 हजार रुग्ण बरे झाले, तर 344 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. कोरोना संसर्गाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. यापूर्वी 31 जानेवारी रोजी 22,775 प्रकरणे नोंदवली गेली होती. तिसऱ्या लाटेच्या पीकच्या तुलनेत, प्रकरणांमध्ये 93% घट झाली आहे. 20 जानेवारी रोजी 3.47 लाख नवीन प्रकरणे पीकवर आढळून आली.