Goddess Renuka Rathotsav cancel this year

Goddess Renuka Rathotsav cancel this year

 

नाशिकः उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदवडच्या रेणुका मातेचा यात्रोत्सव यंदाही रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे हा निर्णय घेतल्याची माहिती मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली.

चांदवडमध्ये गुरुवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या निर्देशानुसार भक्तांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मात्र, यात्रोत्सव आणि पारंपरिक पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे नवरात्रोत्सवात कोटमगाव (ता. येवला) येथील जगदंबा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनाने घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सप्तश्रृंगीगडावर पासची सक्ती

वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.

असे आहेत नियम

नवरात्रोत्सवाच्या काळात तसेच कोजागरी पौर्णिमेलाही 18 आणि 19 ऑक्टोबरला खासगी वाहनांना गडावर बंदी राहणार आहे. एसटीमध्ये पन्नास टक्के प्रवासी बसवून वाहतूक सुरू राहील. नांदुरी येथील बुथवरून ऑनलाइन पास शक्य असेल तरच मिळेल. पायी दर्शन करण्यासाठी बारा ठिकाणांहून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविडच्या नियमानुसार या काळात फेनिक्यूलर ट्रॉली सुरू राहणार आहे. त्यात फेनिक्यूलरमधील भाविकांना 30 टक्के तर पायरीचे दर्शन घेणाऱ्यांना भाविकांना 70 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे.

गरबा, दांडिया नाही

नाशिक जिल्ह्यात यंदाही नवरात्रोत्सवात साधेपणानेच साजरा करा. या काळात गरबा आणि रास दांडियाचे आयोजन करू नका, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट अजून कायम आहे. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवरात्रोत्सव मंडळांनासाठी लागू केलेली नियमावली जिल्ह्यातही जशीच्या तशी लागू केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमही मोजक्या लोकांच्या उपस्थित साजरा करावा. 

source and Credit: TV9 Marathi