Published by: Ournashik.com
Date: 07-03-2022
युक्रेन आणि रशियामधल्या समन्वयाच्या अभावामुळे अडकलेल्या नागरिकांचं स्थलांतर थांबलं - रेड क्रॉस
Twitter
युद्धग्रस्त युक्रेनच्या आग्नेयकडच्या मारियुपोल या रशियाच्या सैन्यानं वेढा घातलेल्या शहरातून नागरिकांच्या सुटकेची मोहीम थांबवली आहे, अशी माहिती रेड क्रॉस या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय समितीनं दिली आहे. या भागात अडकलेल्या सुमारे २ लाख नागरिकांची सुटका करायचा आमचा प्रयत्न होता, मात्र तो अयशस्वी ठरला असं ट्विट समितीनं केलं आहे. यातून रशिया आणि युक्रेनमध्ये परस्परांसोबतच्या कराविषयीचे तपशील आणि अंमलबजावणी याबाबत कमालीची अस्पष्टता असल्याचं अधोरेखित होतं, असंही समितीनं म्हटलं आहे.
मारियुपोलमध्ये अडकलेल्या नागरिकांना स्थानिक युद्धविरामाच्या वेळी, मानवतावादी दृष्टीकोनातून आखलेल्या विशेष मार्गानं बाहेर काढलं जाईल, असं युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं. मात्र रशियाकडून सातत्यानं गोळीबार सुरु आहे, त्यामुळे तिथे अडकलेल्या नागरिकांना, ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सुखरुप बाहेर काढायचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी ठरला, असा आरोप युक्रेनचे अंतर्गत व्यवहार मंत्रालयाचे सल्लागार अँटन गेराश्चेन्को यांनी केला आहे.
मारियुपोल जवळच्या व्होलनोवाखा शहरातल्या नागरिकांच्या सुटकेसाठीही युद्धविरामाच्या नियोजनाची आखणी केली गेली होती. मात्र याबाबत युक्रेननं केलेल्या आरोपांविषयी रशियानं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. दरम्यान युद्धविरामाच्या काळात सुमारे ३०० लोकांची सुखरुप सुटका केली, असं वृत्त रशियातल्या माध्यमांनी रशियाचं समर्थन असलेल्या फुटिरतावाद्यांच्या हवाल्यानं दिलं आहे.
रशियाच्या मागण्या मान्य करत शस्त्र खाली ठेवले तरच रशिया युद्ध थांबवेल - व्लादिमिर पुतीन
आकाशवाणी
युक्रेननं जर लढाई थांबवली आणि रशियाच्या मागण्या मान्य केल्या, तरच रशिया लढाई थांबवेल, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तुर्कीचे अध्यक्ष ताय्यीप इरडोगन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून सांगितल्याची माहिती क्रेमलिन इथून रशियानं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सनं दिलेल्या या वृत्तानुसार रशियाचे हल्ले हे ठरल्यानुसार होत आहेत. तसंच, युक्रेनतर्फे वाटाघाटी करणाऱ्यांनी अधिक सकारात्मकपणे आणि वस्तुस्थितीला धरून बोलणी करणं आवश्यक असल्याचं पुतिन यांनी म्हटल्याचंही वृत्तसंस्थेनं जारी केलेल्या या पत्रकात नमूद केलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उद्या मतदान
आकाशवाणी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. चांदौली जिल्ह्यातल्या चकीया मतदारसंघासह, रोबर्त्सगंज आणि दुधी या सोनभद्र जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघांसाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत, तर उर्वरीत मतदारसंघांसाठी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येईल अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात ५४ जागांसाठी मतदान होईल. याकरता ७५ महिला उमेदवारांसह एकूण ६१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात विद्यमान मंत्री राम शंकर सिंह पटेल, रवींद्र जैस्वाल, डॉक्टर निलकंठ तिवारी, अनिल राजभर आणि संगीता बलवंत यांचा समावेश आहे. आसाममधल्या माजुली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही उद्या मतदान होणार आहे.
भारताचा श्रीलंकेवर १ डाव आणि २२२ धावांनी विजय
आकाशवाणी
मोहाली इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात, भारतानं श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेला कालच्या ४ बाद १०८ या धावसंख्येत केवळ ६४ धावांचीच भर घालता आली, आणि त्यांचा पहिला डाव केवळ १७४ धावांतच आटोपला. भारताच्यावतीनं रवींद्र जडेजा यानं पहिल्या डावात ५ गडी बाद केले. पहिल्या डावात ४०० धावांनी पिछाडीवर पडल्यानं, श्रीलंकेवर फॉलोॉनची नामुष्की ओढावली. त्यानंतर दुसऱ्या डावातही, भारताच्या फिरकीसमोर श्रीलंकेची फलंदाजी गडगडली. त्यांचा दुसरा डाव केवळ १७८ धावांतच आटोपला.
श्रीलंकेच्या वतीनं निरोषन डिकवेला यानं सर्वाधिक नाबाद ५१ धावा केल्या. भारताच्या वतीनं रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ४, तर मोहम्मद शमी यानं २ गडी बाद केले. या सामन्यानंतर अश्विन याच्या कसोटी बळींची संख्या ४३६ झाली आहे. त्यानं कपील देव यांना मागे टाकत, कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या वतीनं सर्वाधिक गडी बाद करणाऱ्यांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. पहिल्या डावात नाबाद १७५ धावांच्या खेळीसह सामन्यात ९ बळी घेतलेल्या रविंद्र जडेजा याला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं. या विजयामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत, भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना येत्या १२ मार्चापासून, बंगळुरु इथल्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.
Source and credit: AIR News