Published by: Ournashik.com
Date: 02-03-2022
युक्रेनच्या मुद्द्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ. एस. जयशंकर आणि पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यामध्ये सहभागी झाले होते.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा’चा आढावा घेण्यासाठी कालही त्यांनी एक बैठक घेतली होती. तिथे अडकलेले भारतीय सुरक्षित रहावे यासाठी संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.
ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानंही सामील होणार
आकाशवाणी
गंगा अभियानांतर्गत युक्रेन मधुन भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात सुचना केली होती.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त भारतीयांना मायदेशी परत आणलं जाईल, असं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे. या साठी हवाई दलाच्या सी-17 विमानांचा उपयोग केला जाणार आहे
युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
आकाशवाणी
रशियानं युक्रेनमधल्या खारकिव्ह शहरावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही माहिती दिली. नवीन जी. असं या मुलांचं नाव असून, तो कर्नाटकातल्या हावेरी या गावाचा रहिवासी आहे. मंत्रालयानं नवीन याच्या मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबियांना कळवलं असून, तीव्र दुःखही व्यक्त केलं आहे. आपण नवीन याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माणी यांनीही नवीन याच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांचं सांत्वन केलं. नवीन याचं पार्थिव हावेरी इथं आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायचं आश्वासनही त्यांनी दिलं.
आत्तापर्यंत युक्रेनमधून ९ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुखरूप मायदेशी परतले आहेत, तर काही जण सुरक्षित स्थळी पोचले आहेत. तर रशियाचे हल्ले होत असलेल्या खारकीव्ह आणि युक्रेनमधल्या इतर शहरांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांसह अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या सगळ्यांना तिथून सुरक्षित बाहेर पडता येईल यासाठीची सोय करावी अशी मागणी भारतानं रशिया आणि युक्रेनच्या दुतावासांकडे केली आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं आहे.
आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणता यावं यासाठी भारतानं युक्रेन सीमेलगत असलेल्या बेल्गोरॉड या रशियाच्या शहरात पथकही तैनात केलं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी रशिया आणि युक्रेनमधले भारताचे राजदूतही स्थानिक पातळीवर पाठपुरावा करत आहेत असंही मंत्रालयानं कळवलं आहे.