छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे इतिहास संशोधक डॉक्टर सुरेश शिखरे यांचं विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची आरमार निती’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीवरुन या व्याख्यानाचं प्रसारण होणार आहे.शिवजयंती निमित्त नंदूरबार जिल्ह्यात शहाद्यातील एका तरुणीनं रांगोळीच्या माध्यमातून पाच हजार चौरस फूट जागेत शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. बी फार्मसीची विद्यार्थीनी असलेल्या वैष्णवी पाटील हिनं शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 96 तासांच्या मेहनतीतून ही प्रतिमा साकारली आहे.
अमरावतीमध्ये शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी पन्नास फूट लांबीची पर्यावरण-पूरक तलवार बनवली आणि त्या तलवारीवर शिवसृष्टी निर्माण केली आहे. ही तलवार घडविण्यासाठी अठरा दिवस लागले.छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहिली आहे,यापुढेही तशीच राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त वंदन केलं आहे.
शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.