Ournashik News

Ournashik News

राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर

आकाशवाणी
राज्याचा आर्थिक वर्ष २०२२-२०२३ चा आणि महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पामधे महसुली जमा ४ लाख ३ हजार ४२७ कोटी रुपये आणि महसुली खर्च ४ लाख २७ हजार ७८० कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी २४ हजार ३५३ कोटी रुपये महसुली तुट येत आहे. अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी विकासाची पंचसूत्री या कार्यक्रमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

या आर्थिक वर्षासाठी वार्षिक योजना कार्यक्रम खर्चाची रक्कम १ लाख ५० हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचीत जाती उपयोजनेच्या १२ हजार २३० कोटी रुपये तर आदिवासी विकास उपयोजनेच्या ११ हजार १९९ कोटी रुपये नियतव्ययाचा समावेश आहे. या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री सादर केली असून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग यांचा समावेश असलेल्या योजनांसाठी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून त्यासाठी येत्या तीन 

वर्षांत चार लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, अशी घोषणा पवार यांनी केली. कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी २३ हजार ८८८ कोटी रुपये, आरोग्य क्षेत्रासाठी ५ हजार २४४ कोटी रुपये, मनुष्यबळ विकासासाठी ४६ हजार ६६७ कोटी रुपये, पायाभूत सुविधा आणि वाहतूकीसाठी २८ हजार ६०५ कोटी रुपये, उद्योग आणि उर्जा विभागासाठी १० हजार १११ कोटीची रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. कृषी निर्यात धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, असं पवार यांनी सांगितलं.


नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान दिलं जाणार असून त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनेसाठी ३ वर्षात १ हजार कोटी रुपये निधी दिला जाईल. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्याचा समावेश करून अनुदानाच्या रकमेत ५०

 टक्के वाढ करुन ते आता ७५ हजार रूपये वाढ इतकं केलं आहे. मागील दोन वर्षात २८ सिंचन प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला असून येत्या दोन वर्षात १०४ प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी ८५३ कोटी ४५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. मृदा आणि जलसंधारणाची ४ हजार ८८५ कामं दोन वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन असून, त्यासाठी ४ हजार ७७४ कोटी रुपये खर्च प्रस्ताव‍ित आहे. सन २०२२-२३ मधे ६० हजार कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दीष्ट आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेमधे केळी, ड्रॅगन फ्रुट, एव्हॅकॅडो, द्राक्षे आदी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्यानं समावेश आहे. देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा सुरु केल्या जातील.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदींनुसार नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा इथं प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारली जाणार आहेत. मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. अन्न सुरक्षा कार्यप्रणालीच्या बळकटीकरणासाठी २ वर्षात १०० कोटी रुपये उपलब्ध केले जातील. पुणे शहराजवळ अत्याधुनिक “इंद्रायणी मेडिसीटी” उभारण्यात येईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ अंतर्गत १० हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतुद. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा विस्तार नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोली असा करणार.

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत ९८ गुंतवणूक करारातून १ लाख ८९ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक आणि रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३० हजारापेक्षा जास्त स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख रोजगार संधी, मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी ११ हजार ५३० कोटी रुपयाचे ५ प्रकल्प, भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय स्थापित करण्यासाठी १०० कोटी रूपये, पुणे जिल्ह्यात वढु बुद्रुक आणि तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी २५० कोटी रुपये, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषां
शी संबंधित गावांमधल्या १० शाळांकरता १० कोटी रुपये, मुंबई, पुणे आणि नागपूर इथं स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत स्थळांचा हेरिटेज वॉक, रायगड किल्ला आणि परिसर विकासाकरता १०० कोटी रुपये, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत ५०० कोटीची तरतूद, स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मासिक उत्पन्नाची १० हजार रुपयांची मर्यादा ३० हजार रुपये, अष्टविनायक विकास आराखड्यासाठी ५० कोटी रुपये, पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरता ७३ कोटी ८० लाख रूपये, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी ५ लाख घरकुलांकरता ६ हजार कोटी, मुंबईबाहेरच्या झोपडपट्टयांमधे मुलभूत कामे करण्यासाठी १०० कोटी रूपये, बार्टी, सारथी , महाज्योती या संस्थांसाठी प्रत्येकी २५० कोटी रूपये, तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांवरुन ७०० कोटी रुपये करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या इतर मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी केली.
 
 
 
Source and credit:- AIR News