युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!

युक्रेनमधले 16 विद्यार्थी सुखरूप परतले; नाशिककरांच्या आनंदाला पारावार नाही, वाजत-गाजत स्वागत!

नाशिकः हिटलरच्या मार्गावर चालणाऱ्या रशियाच्या (Russia) नाकावर टिच्चून एकीकडे युक्रेन (Ukraine) लढत आहे. त्याचे सारे जग कौतुक करतेय. मात्र, तिथे हजारो भारतीय अडकले असल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. नाशिकचे (Nashik) एकूण 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यापैकी 16 विद्यार्थी मायदेशी परतले असून, त्यांचे अक्षरशः वाजत-गाजत वरात काढून स्वागत करण्यात आले. आपल्या काळजाचा तुकडा आलेला पाहून आई-वडिलांच्या आनंदाला पारावार नव्हता. उरलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी दोघे दिल्लीला पोहचणार असून, उर्वरित दोघे परतीच्या मार्गावर आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रशासनाचे प्रयत्न कामी

रशियाने 24 फेब्रुवारीपासून युक्रेन घशात घालण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याने जोरदार हल्ल्यांना प्रारंभ केला. त्यामुळे सारे जग हादरून गेले. नाशिक जिल्ह्यातील वीस विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेत. त्यांची तातडीने सुटका करा, अशी मागणी त्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. खासदार हेमंत गोडसे यांनाही हे पालक जाऊन भेटले. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून, जवळपास सारेच विद्यार्थी सुखरूप आहेत. त्यातले 16 जण नाशिकला येऊन पोहचलेत. दोन परतीच्या प्रवासात आहेत. दोन दिल्लीला उतरणार आहेत, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

बंकरमध्ये काढले दिवस

नाशिकची आदिती देशमुख युक्रेनमधून परतली. तिने आपल्या आठवणी सांगितल्या. युद्धाचे थरारक अनुभव कथन केले. बंकरमध्ये दिवस काढावे लागले. सारे जीव मुठीत धरून बसले होते. मात्र, आम्ही भारतीय असल्यामुळे जास्त त्रास सहन करावा लागला नाही. सुखरूप पोहचलो हे मोठे आहे, अशा भावना तिने व्यक्त केल्या. आदितीचे भाजपतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले.

श्वानासह विद्यार्थी परतला

नाशिकचा रोहन अंबुरे हा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला होता. त्याने आलस्कन हस्की जातीचा डेल्टा नावाचा श्वास युक्रेनमध्ये घेतला होता. तो या श्वानासह दिल्ली विमानतळावर उतरला. तिथून तो नाशिकला पोहचला आहे. त्याच्या आगमनाची वार्ता पोहचताच त्याचा मित्र परिवार आणि कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

कीव्हमधून तरुण आला

 

युक्रेनमधील कीव्ह शहरात नाशिकमधील राजीवनगर येथील सागर चव्हाण हा तरुण अडकला होता. त्याने भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अनिकेत सोनवणे यांना संपर्क साधला. त्यांनी सुटकेसाठी प्रयत्न केले. सागरसह त्याच्यासोबत नोकरीसाठी असलेले एकूण चाळीस तरुण मायदेशी परतले आहेत.

 

Source and credit: TV9