Latest news today Marathi

Latest news today Marathi

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू

आकाशवाणी
 
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं आजपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार येत्या 11 तारखेला 2022- 23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसंच काल सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिकाही मांडली.नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. याप्रकरणी नियमानुसार गोष्टी होतील अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं पवार म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी या अधिवेशनात पुरेसा वेळ आहे. यासाठी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे आणि ते याला उत्तर देतील अशी अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटीच्या विलीनीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर चर्चा झाली. परिवहन मंत्री हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवतील, असं पवार म्हणाले.

महाविकास आघाडी हे राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार असून आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.शेतकऱ्यांची वीज कापणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच्या अधिवेशनात दिलं होतं, तरीही त्यांची वीज कापली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सभागृहात संघर्ष करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. 
 

युक्रेनमधे अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्रसरकार घड्याळ्याच्या काट्यावर काम करत आहे

आकाशवाणी
 
युद्धग्रस्त युक्रेनमधे अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्रसरकार घड्याळ्याच्या काट्यावर काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. युद्धसदृश स्थितीत भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधे ज्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे, त्याविषयी आपल्या सरकारला जाणीव आहे, असं ते म्हणाले. प्रत्येक भारतीय घरी परत येईल यासाठी केंद्रसरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अनेक ठिकाणी हवामानाच्या प्रतिकूल स्थितीमुळे गोष्टी अवघड होत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आपण अनेक देशांच्या प्रमुखांशी व्यक्तीश: बोललो असून, या मोहिमेत गुंतलेली सगळी मंत्रालयं पूर्ण निष्ठेनं काम करत आहेत, असं ते म्हणाले. चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या सीमेवर असलेल्या देशात विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी गेले असल्यामुळे त्यांना दिलासा मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. युद्धापूर्वी भारत आणि युक्रेन यांच्यातल्या विमान उड्डाणांवर निर्बंध होते. आता मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी निर्बंध शिथिल केल्यामुळे उड्डाणांची संख्या वाढवता येणार आहे. आतापर्यंत सुमारे १२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी परत आणल्याची माहिती त्यांनी दिली. 
 

राज्यात लागू केलेले निर्बंध विविध ठिकाणी लसीकरण आणि पॉझिटिव्हिटी दरानुसार आणखी शिथील

काशवाणी
 
कोविड १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये बदल करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यानुसार  राज्याच्या विविध भागातला कोवीडचा प्रादुर्भाव, लसीकरणाचं प्रमाण, कोविड  पॉझिटिव्हिटीचं प्रमाण आणि कोविड रुग्णांच्या खाटांची संख्या या गोष्टींचा आढावा घेऊन संबंधित विभागात निर्बंध कठोर अथवा शिथिल केले जातील. येत्या ४ तारखेपासून पुढच्या आदेशापर्यंत हे नवे नियम लागू राहणार असल्याचं शासनानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

नवी नियमावली   लागू करताना  राज्यातल्या सर्व महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनं स्वतंत्र युनीट म्हणून गृहीत धरले जातील. ज्या प्रशासकीय विभागातकोविड लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांचं प्रमाण ९० टक्के आहे, दुसरी मात्रा ७० टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी घेतली आहे, पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यापेक्षा कमी आहे तर ऑक्सिजन सुविधे  सह कोविड खाटांची संख्या ४० टक्क्याहून कमी आहे, अशा विभागांचा समावेश गट अ मध्ये करण्यात आला आहे. गट अ मध्ये समावेश असलेल्या भागातले  शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, उपहारगृह, बार. क्रीडा संकुलं, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळं , नाट्यगृह, पर्यटन स्थळं, मनोरंजन पार्क या ठिकाणी १०० टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्याची  परवानगी देण्यात आली आहे. 
 
नव्या नियमावलीनुसार मोठ्या प्रमाणात जनतेशी संपर्क होतो अशा आस्थापनांमधले  सर्व कर्मचारी,  घरपोच सेवा पुरवणारे,  सार्वजनिक वाहनांचा  वापर करणारे प्रवासी, मोल, सिनेमा गृह, नाट्यगृह, पर्यटन स्थळं, उपाहारगृह, क्रीडा संकुलं, धार्मिक स्थळं, अशा ठिकाणी येणाऱ्यांचं संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे. 

गट अ मध्ये येणाऱ्या विभागात सर्व सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवर २०० जण अथवा  ५० टक्के यापैकी कमी संख्येची  मर्यादा असेल. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून सर्व पूर्व-प्राथमिक आणि आंगणवाडी शाळांमध्ये पूर्ण क्षमतेनं प्रत्यक्ष  वर्ग सुरु करता येतील. अ गटात समावेश नसलेल्या प्रशासकीय विभागात  मात्र या सर्व आस्थापनांमध्ये  ५० टक्के मर्यादा कायम राहील. सरकारी आणि खासगी कार्यालयं तसंच औद्योगिक आस्थापना  पूर्ण क्षमतेनं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांनी १०० टक्के लसीकरणावर जोर द्यावा तसंच  अ गटा बाहेरच्या विभागांनी  घरोघरी जाऊन लसीकरण करावं असे निर्देश देण्यात आले आहेत.
 

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची - नरेंद्र मोदी

आकाशवाणी
 
आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज तंत्रज्ञान आधारित विकास या विषयावरच्या वेबिनारमधे बोलत होते. सामान्य माणसाला सक्षम करण्यसाठी तसंच स्वयंपूर्ण भारताकरता मजबूत पाया तयार करण्यासाठी तंत्रज्ञान हे अभावी माध्यम आहे, असं ते म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान ही परस्परांपासून अगदी वेगळी क्षेत्रं नाहीत, ती दोन्ही डिजीटल अर्थव्यवस्थेशी घट्ट जोडलेली आहेत. आणि त्यांचा पाया आधुनिक तंत्रज्ञान हाच आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वंयपूर्णता आणण्यावर सरकारचा भर असून त्यादृष्टीनं अनेक पावलं उचलली आहेत. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धीमत्ता, ड्रोन्स, अंतराळ तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान अशा झपाटयानं पुढं येणाऱ्या क्षेत्रांवर भर दिलेला आहे, असं त्यांनी सांगितलं. सर्व क्षेत्रांमधल्या तंत्रज्ञानात मेक इन इंडियाचा अवलंब केल्यानं सुरक्षितता आणि स्वयंपूर्णतेची जाणीव निर्माण होईल, असं ते म्हणाले.
 

विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही - जयंत पाटील

आकाशवाणी
 
विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजपा राजीनाम्याची मागणी करत आहेत, असं ते म्हणाले. नवाब मलिक यांच्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिलं जाईल, पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात. म्हणून विरोधकांनी चहापानाला यावं. असं आवाहनही जयंत पाटील यांनी केलं. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आढावा बैठक अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातल्या कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल, असंही जयंत पाटील म्हणाले.
 
 
 
 
 
Source and credit: AIR news