दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे.

ही परीक्षा प्रत्यक्ष स्वरूपात होत असल्याने सर्व विद्यार्थ्यांना कोविड-१९ संदर्भातील सूचनांचं पालन करणं अनिवार्य असणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील २१ हजार ३८४ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली असून या परीक्षेसाठी १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात आठ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि सात लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन मंडळाकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तसंच परीक्षा काळात गैरमार्गावर आळा घालण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावरून भरारी पथकेही नेमण्यात आली आहेत.

एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी कालपर्यंत म्हणजेच १४ मार्च रोजी सकाळी ११ पर्यंत ऑनलाइन अर्ज विलंबशुल्क न आकारता मंडळाकडून स्वीकारण्यात आली. विद्यार्थ्यांनी मंडळातर्फे प्रसिद्ध केलेले आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे असं आवाहनही मंडळानं केलं आहे. 
 
 
Source and credit:AIR News