युक्रेनमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची संध्याकाळी बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल या बैठकीला उपस्थित होते.
त्यापूर्वी विद्यार्थ्यांसह युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. जगात शांतता कायम रहावी आणि युद्ध वाढेल अशी कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी भारताची इच्छा असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार सुरक्षाविषयक धोरणांचे उच्चपदस्थ अधिकारी जोसेप बोरेल फाँटेल्स यांच्याशी चर्चा करून परिस्थिती समजून घेतली.
तसंच ही परिस्थिती निवळण्यासाठी भारत कसं योगदान देऊ शकतो याविषयी चर्चा केली. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला रात्री उशिरा युक्रेनमधल्या परिस्थितीसंदर्भात बातमीदारांना माहिती देणार आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या तणावानंतर आज रशियानं युक्रेनविरोधात प्रत्यक्ष लष्करी कारवाईला सुरुवात केली. रशियाच्या लष्कराने युक्रेनची पूर्व सीमा ओलांडत, क्रायमियामध्ये प्रवेश केला.
यावेळी रशियानं युक्रेनच्या प्रदेशात क्षेपणास्त्रही डागली. त्यामुळे युक्रेनची राजधानी केईव्ह सह, खारकीव्ह आणि इतर शहरांमध्ये स्फोट झाल्याचं, तसंच केईव्ह विमानतळ परिसरात चकमक झाल्याचं वृत्त आहे. युक्रेनविरोधात लष्करी कारवाई सुरु करण्यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या सैनिकांना माघारी परत जाण्याचं आवाहन केलं होतं.
आपला हेतू युक्रेनवर ताबा मिळवण्याचा नाही, पण आपल्या विरोधात कोणी कारवाई केली तर त्याला रशिया प्रत्यूतर देईल असा इशारा पुतिन यांनी यावेळी दिला.रशियानं केलेल्या कारवाईनंतर त्यांची ६ लढाऊ विमानं आणि २ हेलिकॉप्टर पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे.
रशियाची कारवाई म्हणजे त्यांची युद्धखोरी वृत्ती आहे, या हल्ल्यापासून युक्रेन स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेलही अशी प्रतिक्रिया युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी दिली आहे.या हल्ल्यानंतर युक्रेननं रशियासोबतचे सर्व राजनैतिक संबंध संपुष्टात आणले असल्याची घोषणा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेनस्की यांनी केली आहे. रशियाच्या या कारवाईला विरोध असलेल्या रशियातल्या नागरिकांनी या हल्ल्याविरोधात आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
भारतासह जागतिक समुदायातूनही या हल्ल्याविरोधात प्रतिक्रिया आल्या आहेत. मालमत्ता आणि जीवीताचं नुकसान करणारं युद्ध सुरु केल्याबद्दल जग व्लादिमीर पुतिन यांना दोषी मानेल अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी व्यक्त केली आहे.
युक्रेनवरच्या या हल्ल्याविरोधात अमेरिका आणि त्यांचे इतर मित्रदेश एकत्रितपणे प्रत्युत्तर देतील, जगानं एकदिलानं या हल्ल्याला विरोध करावा असं बायडन यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार सुरक्षाविषयक धोरणांचे उच्चपदस्थ अधिकारी जोसेप बोरेल फाँटेल्स यांच्याशी चर्चा करून परिस्थिती समजून घेतली. तसंच ही परिस्थिती निवळण्यासाठी भारत कसं योगदान देऊ शकतो याविषयी चर्चा केली.
विद्यार्थ्यांसह युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. जगात शांतता कायम रहावी आणि युद्ध वाढेल अशी कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी भारताची इच्छा असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचे महासिचव अँटोनियो गुटेरस यांनी पुतिन यांना, रशियानं युक्रेनवरचा हल्ला त्वरीत थांबवावा, असं आवाहन केलं आहे.
Source and Credit:- AIR News