विधानसभा निवडणूक 2022 निकाल

विधानसभा निवडणूक 2022 निकाल

विधानसभा निवडणुकीत मिळालेलं भरघोस यश हे भाजपाच्या नीती-प्रधानमंत्री

आकाशवाणी
 
विधानसभा निवडणुकीत मिळालेलं भरघोस यश म्हणजे भाजपाच्या विश्वास, नीती, नियत आणि निर्णयांवर मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. नवी दिल्ली इथल्या भाजपा मुख्यालयात जल्लोषाच्या वातावरणात ते बोलत होते.

या विधानसभा निकालांनी २ हजार २४ चा निवडणूक निकाल निश्चित केला, असा विश्वासही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. जनतेच्या आशीर्वादानं आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या परिश्रमानं हे यश मिळालं, या निकालांनी भाजपाच्या कार्यतत्पर प्रशासनावर शिकामोर्तब केलं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

गरीबांचा विकास हाच भाजपाचा ध्यास आहे. गरीबांच्या हक्कांसाठी आपण कार्यरत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 
 
आजच्या यशात नवमतदार आणि महिलांच्या भरघोस प्रतिसादानं महत्वाची भूमिका निभावल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
 
 
 
 
आम आदमी पक्षाचा पंजाब विधानसभा निवडणूकीत मोठा विजय
आकाशवाणी
 
आम आदमी पक्षाकडे विकासाचा आराखडा असल्यामुळेच, पक्षाचा पंजाब विधानसभा निवडणूकीत मोठा विजय झाला अशी प्रतिक्रिया, आम आदमी पार्टी अर्थात आपचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.

पंजाबमधल्या विजयानंतर केजरीवाल यांनी नवी दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. आजच्या निकालातून पंजाबमध्ये क्रांतीचे वारे वाहू लागले असल्याचं दिसतं, या निकालानं पंजाबच्या नागरिकांनी नवा इतिहास रचला आहे, असं ते म्हणाले. 

पंजाबमधल्या नागरिकांनी राज्यातल्या राजकारणासाठी नवा पर्याय स्विकारत आपला संधी दिली आहे, असं म्हणत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पंजाबच्या नागरिकांचे आभार मानले.
 
 
 

पंजाब वगळता इतर सर्व राज्यांत भाजपाला आघाडी

airnewsalerts
पंजाब विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहूमत मिळालं आहे. निवडणूक आयोगानं आतापर्यंत ११७ जागांसाठी निकाल जाहीर केले. त्यामधे आम आदमी पक्षाला ९२, भाजपला २, शिरोमणी अकाली दलला ३, काँग्रेसला १८ आणि अपक्ष तसंच इतर पक्षातील उमेदवारांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

सुलतानपूर लोधीची जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली आहे. पठाणकोटमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा विजयी झाले आहेत. या निवडणूकीत अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यात ११ वेळा आमदार आणि पाच वेळा मुख्यमंत्री असलेले प्रकाशसिंग बादल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया, मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा असलेले चरणजीत सिंग चन्नी, चार वेळा आमदार आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, अर्थमंत्री मनप्रीत बादल, उपमुख्यमंत्री ओम प्रकाश सोनी आणि इतरांचा समावेश आहे.

 
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सुरु आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. आतापर्यंतचे कल आणि निकाल पाहता पंजाब वगळता इतरत्र भाजपानं आघाडी घेतली आहे.

पंजाबमधे आपन निर्णायक बहुमत मिळवलं आहे. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशात भाजपाला निर्णायक आघाडी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधल्या ४०३ पैकी २७४ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीचे १२४ उमेदवार आघाडीवर आहेत. इथं काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी २ तर बहुजन समाज पक्षाचा १ उमेदवार आघाडीवर आहे.

उत्तराखंडमधल्या ७० जागांपैकी भाजपा ४८ जागांवर तर, काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे. मणिपूर मध्ये सत्ताधारी भाजपा प्रणित आघाडी पुढे आहे. ६० जागांच्या विधानसभेत भाजपा ३२ काँग्रेस ५ आणि एनपीपी ७ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात ४० जागांपैकी भाजपानं २० जागांवर तर, काँग्रेस १२ जागांवर विजय मिळवला आहे.
 
 

Source and credit: AIR News