गोदावरी तीरेवर - MARATHI SAHITYA SAMMELAN SOHALA -२०२२

 

गोदावरी तीरेवर - MARATHI SAHITYA SAMMELAN SOHALA -२०२२

पोशिंदा देशाचा

देशाच्या पोशिंद्याला पोसणारा कोण आहे?

पण, अर्थव्यवस्थेला जबाबदार मात्र तोच आहे

 

डोळ्याला डोळा त्याचा रातीला लागत नाही

ढेकळात उभा राहून पावसाची वाट पाही

तरीही पाय रोवून दुष्काळातल्या वादळात

कष्टाचे चटके अन् बोजा कर्जाचा सोसतोच आहे

देशाच्या पोशिंद्याला पोसणारा कोण आहे

पण अर्थव्यवस्थेला जबाबदार मात्र तोच आहे

 

वर्षभर त्या मातीसंग जुगार असतो तो खेळत

प्रत्येक डावात आख्खी जिंदगानी असतो तो हारत

एखादा डाव जिंकल्यावर आभाळ ठेंगणं होतं

पुढचा डाव ही जिंकलंच,शाश्वती कोण देतं आहे?

देशाच्या पोशिंद्याला पोसणारा कोण आहे?

पण, अर्थव्यवस्थेला जबाबदार मात्र तोच आहे

 

पगारदार ही भाव वाढले की तोंड मुरडतात

चैनलवालेही त्या बातमीचा बाजार भरवतात

हा तर अपमान होतो त्याच्या कष्टाच्या घामाचा

निसर्गचक्रात स्वतः कर्मगती आजमावत आहे

देशाच्या पोशिंद्याला पोसणारा कोण आहे

पण अर्थव्यवस्थेला जबाबदार

मात्र तोच आहे

 

हो, पोरींची लग्न त्यालाही वाजत-गाजत करायचंय

अहो,पोराला ही मोठा साहेब बनवायचंय

आईबापाला ही घडवायची आहे तीर्थयात्रा

त्या कुणब्यालाही स्वप्न बघण्याचा अधिकार आहे

देशाच्या पोशिंद्याला पोसणारा कोण आहे?

पण, अर्थव्यवस्थेला जबाबदार मात्र तोच आहे

 

सीतेची माता(भूमाता) जसं सारं घेते स्वतःत सामावुन

तसंच हा शेतकरी ही लागतो कामाला सारं काही विसरून

त्यालाही माहीत आहे येणार दिवस त्याचाही

पण, याच आशेवर तो कुठवर तग धरणार आहे

देशाच्या पोशिंद्याला पोसणारा कोण आहे

पण, अर्थव्यवस्थेला जबाबदार मात्र तोच आहे

 

सौ मनिषा निलेश भंदुरे

Categorey: Poetry

Author: सौ मनिषा निलेश भंदुरे

गोदावरी तीरेवर - MARATHI SAHITYA SAMMELAN SOHALA -२०२२